जळगाव मिरर | ६ मे २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जात असून नुकतेच मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणला जाणारा १३ लाख १५ हजार रूपयांचा काका पान मसाला व गुटखा सांगवी पोलिसांनी जप्त केला. मुंबई-आग्रा महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून कंटेनर ताब्यात घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना सेंधव्याकडून शिरपूरकडे पान मसाला युक्त गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार त्यांनी ४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता पळासनेर गावाजवळ संशयित कंटेनर चालकाला थांबण्याचा इशारा केला. पण चालकाने कंटेनर थांबवला नाही. त्यामुळे पोलिसांनी कंटनेरचा हाडाखेड सीमा तपासणी नाक्यापासून पाठलाग केला. हा कंटेनर पोलिसांनी सोनगीर गावाजवळ पकडला.
तसेच चालक शौकीन चांद (वय. ३५, रा. मेवात, हरियाणा) याला ताब्यात घेतले. कंटेनरमध्ये काका ब्रँडचा पान मसाला व तंबाखू, केसी १००० जाफरान जर्दा, प्रीमियम पानमसाला, प्रीमियम तंबाखू असा १३ लाख १५ हजार ५६ रुपयांचा मुद्देमाल आढळला. या कारवाईत १५ लाखांच्या कंटेनरसह २८ लाख १५ हजार ५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.




















