जळगाव मिरर | ११ मे २०२४
शरद पवार यांनी सन १९९९ ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हापासून राज्यात जातीपातींचे राजकारण सुरू झाले. त्यापूर्वी राज्यात कधीही अशी परिस्थिती नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे शरद पवारांबरोबर होते; परंतु शरद पवारांसारखे त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. भांडारकर इन्स्टिट्यूट हल्ला प्रकरण, जेम्स लेन प्रकरण पाहा, संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी पुतळ्यांचा विषय पाहा. या सर्वांमध्ये शरद पवारांनी जातीपातींचे घाणेरडे राजकारण केले. ते जसे फतवे काढू शकतात, तसा फतवा आज मी काढत आहे. राज्यातील भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्याच उमेदवारांमागे तुम्ही उभे राहा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केले.
महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे सारसबाग चौकात आयोजन करण्यात आले होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, बाबू वागस्कर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अभिनेते प्रवीण तरडे, शिवसेना शिंदे गटाचे नाना भानगिरे, आरपीआयचे सचिन खरात उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले की, गेल्या ४०-५० वर्षांत झालेल्या निवडणुकीत काहींना काही विषय होते. परंतु यंदाच्या निवडणुकीत कोणताच विषय नाही. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांना शिव्या देत आहेत. एकमेकांची लायकी काढत आहेत. हे सर्व लोकं तुमच्या प्रश्नावर बोलतच नाहीत. आपल्या डोळ्यादेखत शहरांची वाट लागत आहे. परंतु हे लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत. आपल्याकडे नोकऱ्या आहेत, चांगले शिक्षण आहे. तरीही तरुण मुलं-मुली परदेशात का जात आहेत? याचे प्रमुख कारण आपल्याकडे वातावरण अतिशय घाणेरडे असल्यानेच त्यांना बाहेर काढले, ढकलले जात आहे. मुंबई शहर बरबाद होण्यासाठी काही काळ गेला. परंतु पुणे शहराची वाट लागायला क्षणाचाही वेळ लागणार नाही. कोणतेही नियोजन न करता बेसुमारपणे शहरे वाढत आहेत.
पुणे शहराची लोकसंख्या ५०-६० लाख आहे. परंतु वाहनांची संख्या ७२ लाखांच्या पुढे गेली आहे. एवढी वाहने वाढल्यावर ती चालण्यासाठीचे रस्ते मात्र आहे तेवढेच आहेत. मग वाहने कुठून चालणार आहेत? याबाबत कोणीही काहीही पावले उचलत नाही. या शहरांचे नियोजन जर आज झाले नाही तर ही शहरं तुटतील. त्यासाठी काम करणे गरजेचे आहे. पुणे शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी मी केव्हाही तयार आहे. फक्त तुमची साथ गरजेची आहे, असे या वेळी राज ठाकरे म्हणाले.