
जळगाव मिरर | २५ मार्च २०२६
भुसावळ तालुक्यात दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवार दि. २४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास चिंचोली व उमाळा गावादरम्यान टेकडीजवळ हा अपघात झाला. या अपघातात श्रीकांत सुरेश पवार (वय २८, रा. कुऱ्हपानाचे, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या सोबत असलेला मित्र आणि दुसऱ्या दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत पवार हे उमाळा येथील एका पाईप कंपनीत काम करत होते. मंगळवारी सायंकाळी ते आपल्या मित्रासह दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघाले होते. चिंचोली ते उमाळा दरम्यान असलेल्या टेकडीजवळ पोहोचताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत श्रीकांत पवार गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती श्रीकांत पवार यांना मृत घोषित केले. इतर दोन्ही जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, श्रीकांत पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अवघ्या एका वर्षाची मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने गावात शोककळा पसरली असून चिमुकल्या मुलीच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




















