जळगाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा सप्ताह सुरु आहे. त्याच माध्यमातून जळगाव शहरात विविध सामाजिक संघटना व भाजपतर्फे नागरिकांसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रम आयोजित केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात हि आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील धनदाई माता मंदिर येथे तज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनात विनामूल्य जन आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मल्टिपॅरामिटर रक्तदाब तपासणी, ग्लुकोमीटरवर डायबेटीस तपासणी, ईसीजी तपासणी, रक्त तपासणी, जनरल फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, तज्ञ होमिओपॅथिक व आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला व उपचार तसेच गरजू रुग्णांना विनामूल्य सलाईन, इंजेक्शन, वाफ ड्रेसिंग इत्यादी सुविधा होत्या. हे शिबिर वैद्यकीय शिक्षण ग्रामविकास व क्रीडा युवक मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय येथील सर्व डॉक्टर नर्स व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
