
पाचोरा : प्रतिनिधी
तालुकयातील लोहारा येथील २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुणास विषारी सर्पाने चावा घेतल्याने त्याचा जिल्हा रुग्णलयात जात असतांना रस्त्यामध्येच प्राणज्योत मालविल्याची धक्कादायक घटना आज दि ११ रोजी पहाटे घडल्याने नातेवाईकामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर माहिती अशी कि, अवघ्या दोन महिन्यांपासून सुट्टीनिमित्त निलेश शेळके गावी आलेला होता. वडिलांना कामात मदत व्हावी, म्हणून तो शेतीकाम व दैनंदिन गुरांना चारापाणी करण्याचे काम करीत असतांना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास गुरांना चारा टाकण्यासाठी गेला होता. कडब्याची पेंढी उचलत असताना त्यास विषारी सर्पाने चावा घेतला. सुरुवातीला ही बाब त्याच्या लक्षात आली नाही थोड्याच वेळात त्याला वेदना होत असल्याने तो घरी चालत आला व काहीतरी माझ्या हाताला चावला, मला मळमळ व गरगरल्यासारखे होत आहे असे त्याने कुटुंबीयास सांगितले. कुटुंबीयांनी गांभीर्याने त्यास लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात खाजगी वाहनाने घेऊन गेले.
मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली असावी. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. कुटुंबीयांचा व नातलगांचा आक्रोश हा मन हेलावणारा होता. मयत निलेश सुधीर शेळके (वय २५) हा उच्चशिक्षित डी फार्मसी झालेला असून गोवा येथील औषध निर्माता कंपनीमध्ये कामाला होता. नोकरी करून पैसे कमवेल व चांगले घर बांधेल असे त्याचे स्वप्न असल्याचे रडताना मनास वाट मोकळी करताना त्याच्या वडिलांच्या टाहोमधून शब्द बाहेर पडत होते. मृत तरुणांच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. रक्षाबंधन उत्सवाच्या दिवशी हा दुःखाचा दिवस शेळके कुटुंबीयांवर आल्याने परिवार व नातलग यांच्या कायम स्मरणात राहील.




















