जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२६
भाजीपाला घेवून निघालेल्या ५६ वर्षीय प्रौढाला सुसाट डंपर चालकाने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास कालींका माता मंदिराजवळ घडली. प्रभाकर रघुनाथ पाटील (रा. तैली चौक, जुने जळगाव) असे मृताचे नाव आहे. संतप्त जमावाने प्रशासनाविरूध्द संताप व्यक्त करत थेट डंपरच्या काचा फोडल्या.
जुने जळगावातील तैली चौकात प्रभाकर रघुनाथ पाटील यांचे घर आहे. हात मजूरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचे. सायंकाळी भाजीपाला घेवून ते घराकडे पायी निघाले. रात्री ८ वाजेच्या सुमारास कालिंका माता मंदिराजवळून जात होते. तेव्हा नशिराबादकडून एक सुसाट विनाक्रमांकाचे डंपरने पाटील यांना धडक देवून चिरडले. पाटील यांना डंपरने चिरडताच, नागरिकांनी डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, चालक डंपर न थांबवता पुढे निघाला. अखेर जवळच नागरिकांनी डंपर अडवला. घटनेनंतर चालक तेथून पसार झाला. परंतू तेरा महिन्यात ही दुसरी घटना झाल्यामुळे संतप्त हजार ते दोन हजार जमाव तेथे जमला. संतप्त नागरिकांनी डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रौढाला डंपरने चिरल्यानंतर संतप्त जमावाकडून डंपरची तोडफोड करण्यात येत असल्याची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसी नितीन गणापुरे यांच्यासह एमआयडीसी, शनिपेठ, रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सुमारे हजारावर जमावाकडून संताप व्यक्त करण्यात आला. वारंवार घटना घडून सुध्दा अवजड वाहने कोल्हे विद्यालयाच्या रस्त्यावर सुरू आहे. दिवसभर विद्यार्थ्यांची ये-जा असते, यात अवजड वाहने बंद करा, पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. दोन तास हा गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर गोंधळ शांत झाला. डंपर चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे अपघात झाला असून चाक थेट तोंडावरून गेल्यामुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याच चौकात साधारण वर्षभरापूर्वी डंपरने एका बालकाला चिरडल्याची घटना घडली होती.





















