
जळगाव मिरर | १८ जून २०२५
राज्यातील अनेक शहरातून खळबळजनक बातमी समोर येत असतांना आता कोल्हापूर जिल्यातील कागल तालुक्यातील केनवडे येथे पहाटेच्या सुमारास घराच्या मागील बाजूस असलेल्या गोबरगॅसच्या खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१७) घडली. स्वरा पंकज पाटील असे या चिमुकलीचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेने केनवडे गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटेच्या सुमारास स्वरा घराच्या अंगणात खेळत होता. खेळत खेळत ती घराच्या मागील बाजूस असणाऱ्या गोबरगॅसच्या खड्ड्याजवळ गेली आणि त्यात पडली. स्वरा दिसत नसल्याने पंकज यांनी घरातील सदस्यांना विचारले असता त्यांनी ती आजोबांसोबत बाहेर गेली असल्याचे सांगितले. मात्र, आजोबा घरी आल्यानंतर ती सोबत नसल्याचे सांगितल्यावर घरातील लोकांची धावपळ उडाली. तिचा परिसरात शोध घेतला असता ती खड्ड्यातील पाण्यात तरंगताना दिसून आली. तिला तत्काळ पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी आई-वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय हेलावून टाकणारा होता.