जळगाव मिरर | १२ जून २०२५
जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या आणि दरवर्षी दक्षिण आफ्रिकेत पार पडणाऱ्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ (९०+ कि.मी.) शर्यतीत यंदा जळगाव जिल्ह्याच्या तिन्ही महिलांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे. २२,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटूंमध्ये आपले स्थान निर्माण करणाऱ्या या पराक्रमी महिला म्हणजे – डॉ. अर्चना काबरा, विद्या बेंडाळे आणि डॉ. रती महाजन.
या जागतिक यशाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) आणि जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सन्मानित महिलांनी ही शर्यत जिंकताना केवळ अंतर कापले नाही, तर धैर्य, जिद्द आणि आत्मविश्वासाचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले. त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल झाले आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या धावपटूंचे कौतुक करताना जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी त्या आदर्श ठरतील, असे मत व्यक्त केले.जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्यावतीने या तीन वीरांगनांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
