आ.मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकाराने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रलंबित मागण्या केल्या मान्य
जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२५
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 84 लाख महिला उमेद (महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान) अंतर्गत जोडल्या गेल्या असून, या अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभागाचा दर्जा आणि कंत्राटी अधिकारी-कर्मचारी, तसेच सर्व महिला CRP व केडर यांच्या प्रलंबित मागण्यांच्या मंजुरीसाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हजारो कर्मचारी कडाक्याच्या थंडीत बेमुदत धरणे आंदोलन करीत होते.
काल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला आणि त्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांना ठाम पाठिंबा दर्शविला.
यानंतर मंगेश दादा चव्हाण यांनी तातडीने पुढाकार घेऊन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाचे अधिकारी, आंदोलन प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्याची विनंती केली असता मंत्री महोदयांनी ती मान्य केली तातडीने बैठक घेण्यात आली. बैठकीत उमेद अभियानात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठक संपल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन मान्य झालेल्या मागण्यांबाबत तसेच पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती आंदोलकांना दिली.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महाराष्ट्र महायुती सरकार यांचे आभार मानले.
आमदार चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, “लाडक्या बहिणींचे आवडते देवा भाऊ म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत संवेदनशील नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारे जयकुमारजी गोरे यांच्यासारखे संवेदनशील ग्रामविकास मंत्री राज्याला लाभले आहेत. आजपर्यंत अनेक सरकारे आली, पण या विभागांच्या प्रलंबित मागण्यांवर आश्वासनांशिवाय काहीच झाले नाही. मात्र, या महायुती सरकारने केवळ ऐकून घेतले नाही तर स्वतः मंत्री महोदयांनी बैठक घेऊन आंदोलनस्थळी येत तातडीने निर्णय घेतला, ही मोठी दिलासा देणारी बाब आहे.”




















