जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२४
भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार झालेल्या भीषण अपघातात कारमधील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुधीर देवीदास पाटील (वय-४८) आणि त्यांची पत्नी ज्योती सुधीर पाटील (वय ४४) दोन्ही रा. लोणी ता. पारोळा ह.मु. गुजरात राज्य असे मयत झालेल्या दाम्पत्याची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील लोणी गावातील रहिवाशी असलेले सुधीर पाटील हे आपल्या पत्नी ज्योती पाटील यांच्यासह गुजरात राज्यात वास्तव्याला होते. दरम्यान, लोणी गावातील नातेवाईकांचे ४ डिसेंबर रोजी लग्न असल्याने पाटील दाम्पत्य हे मुळ गावी जाण्यासाठी गुजरात राज्यातून आलेले होते. सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील म्हसवे गावातील फाट्याजवळ सुधीर पाटील हे कार क्रमांक (जीजे ०५ आरएच १२४७) ने लोणी गावी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून पाटील हे कार वळवत असतांना जळगावकडून धुळेकडे जाणारी भरधाव वेगाने जाणारी ऑडी कार क्रमांक (डीडी ०३ के ६९०३) ने जोरदार धडक दिली.
या धडकेत गुजरात येथून कारमध्ये आलेले दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गुजरात पासींग असलेली कारचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. तर ऑडी कारमधील जखमींना तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी फाट्याजवळ ही घटना घडल्यानंतर दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीकांनी एरंडोल ते धुळे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाला लागून समांतर रस्ता करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
वारंवार अश्या घटना होत असल्याने अनेकांची जीव जात आहे. आज मात्र प्रत्यक्षात दोन जण जागीच ठार झाले आहे. त्यामुळे आम्हाला समांतर रस्त्यांसाठी रास्तारोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत रस्त्या बनविण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिले जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचे दिसून आले.