
जळगाव मिरर | १९ मार्च २०२६
यावल तालुक्यातील चिंचोली बसस्थानकाजवळ मंगळवार, दि. १८ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन वर्षांच्या बालकासह पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील प्रमोद प्रकाश साळुंखे हे आपल्या पत्नी जयमाला साळुंखे व दोन वर्षांचा मुलगा प्रिन्स साळुंखे यांच्यासह दुचाकीवरून चिंचोली पेट्रोल पंपाकडून गावाकडे जात होते. त्याच वेळी चोपडा शहराकडून किनगावकडे जात असलेले चोपडा तालुक्यातील पारगाव येथील भावेश गणेश पाटील व कपिल विकास कोळी हे पल्सर (एमएच १९, बीव्ही-९५५५) दुचाकीवरून येत होते.
चिंचोली बसस्थानकाजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात प्रमोद साळुंखे, जयमाला साळुंखे, प्रिन्स साळुंखे तसेच भावेश पाटील व कपिल कोळी हे पाचही जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी किशोर परदेशी व होमगार्ड संजय साळुंखे हे अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. तसेच अनिल सोळुंके यांच्या मदतीने जखमींना तत्काळ खासगी वाहनाने जळगाव येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचार मिळू शकले. या अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.





















