जळगाव मिरर /२३ ऑक्टोबर २०२५
शहरातील नवीन बी. जे. मार्केट येथे बुधवारी दि. २२ रोजी एक महिला व एक पुरुष हे बेशुद्ध अवस्थेत बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती अधिष्ठातांना मिळाल्यावरून त्यांच्या सूचनेवरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्मचारी तत्काळ धावून आले. त्यांनी दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करून त्यांचे प्राण वाचविले. यातून, माणुसकी अजून जिवंत आहे हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. याबाबत कर्मचाऱ्यांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनीवरून नवीन बी. जे. मार्केट परिसरात एक महिला व एक पुरुष आजारी असून ते बेशुद्धावस्थेत असल्याचे कळविले. ऐन दिवाळी सणात लोकं आपापल्या घरी कुटुंबियांसह व्यस्त असताना, मार्केटमध्येही कोणी नसताना बेवारस स्थितीत असलेल्या या दोन्ही नागरिकांना अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी मदतीचा हात दिला. तात्काळ स्मार्ट सर्व्हिसेसचे कक्षसेवक सुपरवायझर राहुल सोनवणे यांना संपर्क साधून दोघांनाही स्ट्रेचरवर ठेऊन रुग्णालयात आणण्यास सांगितले.
राहुल सोनवणे यांनी कर्मचारी योगेश कासार, निलेश पाटील, भूषण सोनवणे, नकुल तायडे, मुकेश शिंदे, करण तायडे यांना सोबत घेऊन दोघंही स्त्री-पुरुषांना स्ट्रेचरच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून बेवारस रुग्णांच्या कक्षात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय पथकांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या मोफत भोजनाची व्यवस्था कर्मचाऱ्यांनी केली. अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. रमेश वासनिक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्यासह जी.पी.एस. मित्र परिवार, पाळधी, जी. एम. फाउंडेशन, गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष, विचार वारसा फाउंडेशन आदींनी अभिनंदन केले आहे.
