जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात पैसे मागितल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीला काठीने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील खंडेराव नगरात शारदाबाई जगन्नाथ कुंभार (वय ३५) या महिला आपले पती जगन्नाथ कुंभार आणि सासू सरस्वती कुंभार यांच्यासह वास्तव्याला आहे. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता शारदाबाई कुंभार यांनी काही वस्तू घेण्यासाठी पतीकडे पैसे मागितले. त्याचा राग आल्याने पती जगन्नाथ कुंभार आणि सासू सरस्वती कुंभार या दोघांनी लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. दरम्यान विवाहितेने याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती जगन्नाथ कुंभार आणि सरस्वती कुंभार या दोघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश चव्हाण करीत आहे.