जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२५
राजकोटमधील रामधाम सोसायटीमध्ये एक हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली. १२८ किलो वजन असलेल्या पत्नीचा पाय घसरून ती पतीच्या अंगावर पडल्याने, ६८ वर्षीय पतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली असून, कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मृत व्यक्तीचे नाव नटवरलाल (वय ६८) असून, त्यांच्या पत्नीचे नाव मंजुलाबाई (वय ६५) आहे. पहाटे सुमारे ४ वाजता नटवरलाल यांच्या मुलाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलाची तब्येत बिघडल्याचे पाहून घाबरलेली मंजुलाबाई जिन्याने धावत वरच्या मजल्यावर जात असताना, अचानक तोल गेल्याने त्या घसरल्या आणि थेट पती नटवरलाल यांच्या अंगावर आल्या.
मंजुलाबाई यांचे वजन सुमारे १२८ किलो असल्याने हा आघात प्रचंड तीव्र होता. या धक्क्याने नटवरलाल यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला खोल जखम झाल्यामुळे ते बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी तत्काळ दोघांनाही रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी नटवरलाल यांना मृत घोषित केले. मंजुलाबाईंना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, इतक्या मोठ्या वजनाने पडल्याने डोक्याला जबर मार लागून नटवरलाल यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी आणि अनपेक्षित घटनेमुळे कुटुंबात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.