जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी आत्महत्या, खुनाच्या घटना सातत्याने घडत असतांना आता बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका नवविवाहितेचा मृतदेह तिच्या सासरच्या घराजवळील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळला आहे. सोनाली वनवे असे या महिलेचे नाव आहे. तिच्या लग्नाला केवळ दोन महिने झाले होते. मात्र पती आणि सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून तिने आपले जीवन संपवल्या आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजुरी मळा या ठिकाणी राहणाऱ्या सोनाली बाळू वनवे (२०) हिचा विवाह दोन महिन्यांपूर्वी जंबुरा वस्ती येथील अनिकेत गर्जे याच्याशी झाला होता. लग्नाचे सनई-चौघडे वाजले. दोन्हीही घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. सोनालीला नवऱ्याचं घर, नवीन माणसं, नवीन स्वप्नं… सारे काही आनंदी वाटत होते. पण लग्नानंतर महिना उलटत नाही तोच तिच्या आनंदाला ग्रहण लागलं. अवघ्या एका महिन्यातच तिच्या सासरच्या मंडळींनी खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली.
सोनालीच्या सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरच्या लोकांकडे ५ लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली. सोनालीच्या माहेरच्या लोकांनी मोठ्या कष्टाने हे पैसे दिले. पण त्यांची पैशांची भूक काही कमी झाली नाही. ते सोनालीचा वारंवार छळ करु लागले. हुंड्याचे पैसे मिळाल्यानंतरही तिचा पती अनिकेत गर्जे ‘मला तू आवडत नाहीस’ आणि ‘मला तुझ्यासोबत राहायचे नाही’ असे बोलून सतत मानसिक त्रास देत होता. सासू प्रतिभा गर्जे आणि सासरे एकनाथ गर्जे हे देखील यात सहभागी होते. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सोनालीने आपल्या आईला आणि माहेरच्यांना याची माहिती दिली.
पण याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांनी सोनालीला समजावले, धीर दिला. पण तरीही तिचा छळ सुरुच होता. यानंतर ३१ ऑगस्ट रोजी सोनाली अचानक बेपत्ता झाली. तिचा कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता, तिच्या सासरच्या घराजवळील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करताना पोलिसांना सोनालीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या. यामुळे हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून छळाला कंटाळून तिला जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका नव्या आयुष्याच्या सुरुवातीलाच क्रूर हुंड्याच्या बळी ठरलेल्या सोनालीच्या प्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी पुन्हा एकदा हुंडाबळी प्रकरण चर्चेत आले आहे.