जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२४
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज राज्यात चार नेत्यांच्या सभेकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून असून नुकतेच बीड येथे पंकजा मुंडे यांची सभा सुरु झाली असून त्यांचे भाषण देखील सुरु झाले आहे.
पंकजा म्हणाल्या, मी गरीबांसाठी काम करणारी आहे. राजकारणाला चिटकून बसणारी नाही. पाच लेकरांनी जीव दिला. त्या आमदारकीचं काय गोड वाटणार आहे. आमदारकी खासदारकी काही नव्हती, तरीही पाच वर्ष तुम्ही आला. उद्याही याल. आपल्याकडे काही असो नसो मी तुमच्या मागे येणारच. जो वंचित आहे. ज्याची पत आणि ऐपत नाही. अशा लोकांसाठी मी राजकारणात आहे. गाड्या घेण्यासाठी नाही. टेबलाखालून पैसे घेण्यासाठी नाही. तुम्ही म्हणता म्हणून मी हेलिकॉप्टरने येते. तुम्ही म्हटला तर बैलगाडीतून येईल, असे दसऱ्या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले.
कितीही वर्ष लागो तुमचं जीवन सुसह्य केल्याशिवाय मी श्वास घेणार नाही. तुमच्या मुलांच्या अंगावरचा मळका शर्ट पाहून मला वेदना होते. पंकजा मुंडे कुणाला घाबरत नाही. अंधारात भेटत नाही. पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते. या मैदानात माझं भाषण ऐकायला लोकं येणार नाही त्या दिवसाला घाबरते. भगवान बाबांना प्रार्थना करते असा दिवस कधीच येऊ देऊ नको. मी मंत्री असताना विकास केला. रस्ते दिले. या बीड जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला. एकही गाव सोडलं नाही. यावेळी गडबड झाली. आपल्याला ही गडबड दुरुस्त करायची आहे.