जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२५
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खुनानंतर अनेकांनी मंत्री मुंडे यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. खंडणीप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्याला केज सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज वाल्मिक कराडला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असून विरोधकांकडून सतत त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. याच दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का?, या प्रश्नावर अजित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार…कुणाकडे काही पुरावे असतील त्यांनी आम्हाला द्यावे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु,” असे रोखठोक उत्तर अजित पवार यांनी दिले आहे. पुढे बोलताना अजित पवार यांनी, “मी पण शेतकरी आहे. शेतकरी म्हणूनच बोलतोय. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते. आम्ही चौकशी करु…कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना अजित पवार यांनी,”जे दोषी असतील जे कोणी असतील त्यांच्यावर करवाई करत आहोत. आरोपींना सरकार म्हणून आम्ही सोडणार नाही. सीआयडी, एसआयटी त्यांचं काम करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हेच सांगितले. आरोपी कुणीही असो त्यांना कुठलाही थारा दिला जाणार नाही. तिथे कडक एसपी आता आम्ही पाठवलेले आहेत. पत्रकारांना ही विनंती त्यांनी ही जाऊन बघावं एसपी तिथले कसं काम करताय. कायदा सुव्यवस्था तिथे राखायची अशा सूचनाच त्यांना दिलेल्या आहेत. कुणाचेही धागेदोरे मिळाले, तर त्यावर कारवाई केली जाईल”, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात येणार हे पाहणे गरजेचे आहे.