जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२६
जळगाव जिल्हा परिषद प्रशासकीय भवनाच्या जुन्या इमारतीत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप करत काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. तात्काळ नवीन पुतळे बसवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की , १८ फेब्रुवारी २०२६ रोजी काही नागरिक वैयक्तिक कामानिमित्त जिल्हा परिषद प्रशासकीय भवनात गेले असता त्यांनी तेथील महापुरुषांच्या पुतळ्यांची पाहणी केली. यावेळी पुतळ्यांची साफसफाई बराच काळ झालेली नसल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावरील भाग उखडलेला असून दाढीखालील भाग भग्न झाल्याचे दिसत आहे. तसेच महाराज ज्या सिंहासनावर विराजमान आहेत त्याला तडे गेलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचीही अशीच अवस्था असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्या बाहेरगावी दौऱ्यावर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बांधकाम, अर्थ व समिती विभागाचे प्रमुख सुनील पाटील यांना प्रत्यक्ष पुतळ्यांजवळ नेऊन परिस्थिती दाखविण्यात आली. त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत रंगरंगोटी, दुरुस्ती, फुले-हार व विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पाहणी केली असता कोणतीही दुरुस्ती, रंगकाम किंवा सजावट झालेली नसल्याचे आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, गोकुळ चव्हाण, विशाल ठाकूर, शहाजी थोरवे, गजू तांबट, संदीप सुरवाडे, विजू कासार, आकाश चव्हाण, अजय कोळी आदींसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत तातडीने नवीन पुतळे बसविण्याची मागणी केली आहे. “महापुरुषांच्या स्मारकांची अशी दुर्दशा सहन केली जाणार नाही,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या प्रकरणी प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर येणे अपेक्षित आहे.




















