जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२४
उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून रोहिदास श्रावण कोळी (वय ३४, रा. कांचननगर) यांना दोन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तूने पोटावर वार केला. यामध्ये कोळी यांना गंभीर दुखापत झाली असून पुन्हा आल्यास जीवंत जाऊ देणार नाही, अशी धमकीदेखील त्यांना दिली. ही घटना शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी तालुक्यातील रिधूर येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचन नगरातील रोहिदास कोळी यांच्याकडे ट्रॅक्टर असून त्यावर प्रभाकर कोळी हे चालक आहे. चालक कामावर येत नसल्याने त्याविषयी प्रभाकर कोळी हे विचारणा करण्यासाठी गेले. चालकाने कामावर येण्यास नकार दिला. त्या वेळी त्याला दिलेले १० हजार ५०० रुपये रोहीदास यांनी परत मागितले. त्याचा त्याला राग आला व चालकासह भाच्याने रोहिदास कोळी यांना शिवीगाळ करीत लोखंडी वस्तू पोटावर मारली. तसेच तू इथून निघून जा, पुन्हा आला तर जिवंत जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करीत आहेत.