
जळगाव मिरर । २२ डिसेंबर २०२२
झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या सम्मेदशिखरजीला झारखंड सरकारने नुकतेच पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. पर्यटनस्थळ जाहीर केल्याने सम्मेदशिखरजीचे पावित्र्य धोक्यात येणार असल्याने बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सकल जैन समाजातर्फे झारखंड सरकारचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा जैन, सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलूभाऊ जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष कस्तुरचंद बाफना, महावीर दिगंबर जिन चैत्यालयचे अध्यक्ष राजेश जैन, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष ललित लोडाया, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ सभाचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, प्रवीण पगारिया, दिलीप गांधी, स्वरुप लुंकड यांच्यासह मोठ्या संख्येने जैन समाजबांधव उपस्थित होते.
पाससनाथ पर्वतराज आणि मधुबन यांना जैन तीर्थस्थळ घोषित करण्यात यावे, त्याठिकाणी सीआरपीएफ, सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन चेकपोस्ट सुरू करण्यात यावे, झाडांची होणारी अवैध कत्तल, दगडांचे उत्खनन व मधासाठी लावण्यात येणाऱ्या आगीच्या घटनांना प्रतिबंध घालावा या मागण्यांचा समावेश जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आहे.




















