जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५
शहरात कांदा विकून मिळालेले पैसे घेवून घरी जाण्यासाठी बसमध्ये चढतांना नरेंद्र युवराज पाटील या शेतकऱ्याच्या खिशातून २२ हजार २२० रुपये चोरुन नेले. बस ही ममुराबाद येथे पोहचल्यानंतर ही घटना शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी बस शहर पोलीस ठाण्यात आणली. याठिकाणी पोलिसांनी बसमधील प्रवाशांची तपासणी करुन बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील शेतकरी नरेंद्र युवराज पाटील हे शेतकरी असून शनिवारी त्यांनी बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणला होता. कांदा विक्री केल्यानंतर त्यांना २२ हजार २०० रुपये मिळाले होते. सायंकाळच्या सुमारास पैसे घेवून ते टॉवर चौकात आले. याठिकाणी ते (एमएच ०७, सी ७४३९) क्रमांकाच्या यावल आगाराच्या बसमध्ये चढत असतांना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत नरेंद्र पाटील या शेतकऱ्याच्या खिशातून पैसे चोरले. ही बस ममुराबाद गावापर्यंत पोहचली असतांना शेतकऱ्याला खिशात पैसे नसल्याचे समजले. त्यांनी ही बाब बसच्या वाहकाला सांगितली.
कांदा विक्रीतून मिळालेले पैसे घेवून जात असलेल्या शेतकरी सकाळपासून उपाशीपोटी होते. चोरट्याने त्यांच्या खिशातून रोकड चोरुन नेल्यापक्ररणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. याठिकाणी हवालदिल झालेले शेतकरी तक्रार न देता ते माघारी फिरले. याप्रकरणी पोलिसांनी पोलीसात स्टेशन डायरीवर नोंद करण्यात आले आहे.
शेतकऱ्याच्या खिशातून पैसे चोरी झाल्याचे लक्षात येताच, वाहकाने बस ममुराबाद गावाजवळून वळवून ती शहर पोलीस ठाण्यात आणली. याठिकाणी शेतकऱ्याने घडलेली आपबिती पोलिसांकडे कथन केल्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर निकुंभ व उद्धव सोनवणे यांनी तात्काळ बसमधील प्रवाशांची तपासणी केली. मात्र त्यांना काहीही मिळून आले नाही. त्यानंतर बस पुन्हा यावलकडे रवाना झाली.