जळगाव मिरर । २३ जानेवारी २०२३ ।
शहरात दि २१ रोजी शनिवारी विविध चौकामध्ये पोलिस पथक दुचाकी व चारचाकीची तपासणी करीत उभे होते यावेळी रॉयल पॅलेस हॉटेलजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अडविल्यानंतर, संबंधित युवक व त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी संबंधित युवक, युवकाचा भाऊ व आई अशा तिघांविरूध्द रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, हॉटेल रॉयल पॅलेससमोर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, विजय खैरे, गणेश देसले, रमेश अहिरे यांच्यासह पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत शनिवारी सायंकाळच्या सुमारास नाकाबंदी करीत होते. यावेळी आकाशवाणी चौकाकडून तीर्थ राजेंद्र पोलोडिया (वय २१) हा तरूण त्याच्या (एमएच १९ डीयू ०४०४) क्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव वेगाने जात होता. पोलिसांनी अडविले असता, तो त्याठिकाणी न थांबता तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान, त्याने पोलिसांसोबत वाद घातला. काही वेळातच त्याठिकाणी त्याची आई व भाऊ हे तेथे आले. त्यांनी मुलाला अडविले, असे सांगत धमकी देत आरडाओरड करू लागले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीर्थ राजेंद्र पोलोडिया याच्यासह त्याचा भाऊ व आई बॉक्सी राजेंद्र पोलोडिया (रा. शांतीनगर) यांच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी विजय खैरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.