जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४
लग्न ही दोन व्यक्तींच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न म्हणजे सर्वांना काव्य सुचते, जसे दोन जीवांचे मधुर मिलन… दो हंसो का जोडा इत्यादी इत्यादी….पण, विवाहानंतर प्रत्यक्षात भिन्न संस्कार,भिन्न परिस्थिती आणि भिन्न कल्पनेत वाढलेली दोन माणसे यात कायमची एकमेकासोबत जोडली जातात आणि यामुळे दोघांचेही जीवन बदलते,असे असले तरी त्यापुढे जात जळगाव येथे परीट समाजातील भिन्न पोटजातींनी एकमेकांचे सोयरे होत एक वेगळा आदर्श पायंडा समाजासमोर ठेवला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई सुरेश माधव महाले यांचे चिरंजीव आकाश आणि जिल्हा पोलीस दलातील पोलीस पोलीस नाईक देवराज भवनराज परदेशी यांची सुकन्या ममता असा मराठी परीट व परदेशी धोबी समाजातील हा विवाह दि. 24 डिसेंबर रोजी येथील पोलीस मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडला. दोन्ही पोटजातींच्या सोयऱ्यांनी एकमेकांना मिठ्या मारत सामाजिक रितिरिवाजाला फाटा देऊन पोकळ विचारांची भिंत पाडून टाकल्याने या विवाहाची एकच चर्चा राज्यभर व जळगाव जिल्ह्यातील धोबी समाजात सुरु आहे.विवाहप्रसंगी दोन्हीकडील आप्तस्वकीय आणि समाजातील मान्यवरांनी हजेरी लावत धोबी समाजाच्या सर्व पोटजातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार करण्यात यावा असे फक्त बोलले जात होते पण महाले व परदेशी परिवाराने हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणून मोठा आदर्श पायंडा निर्माण केल्याने या बाबीचे स्वागत व कौतुक केले.
रोटीसोबत बेटी व्यवहाराला प्रोत्साहन :
समाजात सुरु असलेल्या बदल प्रक्रियेत विज्ञान आणि सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा मानला पाहिजे.जाती-धर्माच्या भिंती कमकुवत झाल्या पाहिजे,त्यामुळे रोटी व्यवहार जिथे होतो तिथे बेटीचा सुद्धा विचार करून सन्मान प्रस्थापित झाला पाहिजे हा विचार हरवला असताना महाले व परदेशी परिवारात झालेल्या या आदर्श विवाहाने एक नवीन विचाराला प्रोत्साहन मिळाले आहे, असे मत विवाहाला उपस्थित ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी व्यक्त केले.
सामाजिक मान्यवर यांची उपस्थिती :
पोटजातीच्या भिंतीना तडा देणाऱ्या या आदर्श विवाहाला जळगाव पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, समाजाच्या आरक्षण समितीचे राज्य प्रमुख विवेक ठाकरे,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश ठाकरे,समाजाचे ज्येष्ठ नेते अमर परदेशी,युवा नेते पंकज नारायणराव शिरसाळे,लॉंड्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण राऊत,संत गाडगे बाबा युवा फौंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र मगन सोनावणे,उपाध्यक्ष प्रभाकर खर्चे,राजेश टेकचंद परदेशी, जे.डी.ठाकरे,डेबूजी फोर्सचे जिल्हाध्यक्ष सागर सपके,राहुल वाघ,मधुकर चहाकर, पो.कॉ. गणेश शिरसाळे,विजय मांडोळे,गणेश सपके,मोरया गृपचे उमाकांत जाधव, रोहित परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.