जळगाव मिरर | १७ जून २०२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या कळवा येथील एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘सामना ऑनलाईन’ या ट्वीटर अकाऊंटवर यासंबंधीची माहिती देण्यात आलेली आहे. अयोध्या पौळ एका कार्यक्रमासाठी कळव्यात होत्या. त्यावेळी त्यांना काही जणांनी घेरले आणि शाई फेकली. केवळ शाईफेक नाही तर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ”शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळव्यात टोळक्याची भ्याड शाईफेक – एका कार्यक्रमासाठी कळव्यात आलेल्या अयोध्या यांना काही जणांच्या टोळक्याने घेरले आणि शाई फेकली ” असं ट्वीट करण्यात आलेलं आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांना अयोध्या पौळ यांनी डिवचलं होतं. राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये हिंगोली येथील कळमनुरी बाजार समितीमध्ये १७ पैकी १७ जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा बांगर यांनी केला होता. पण त्यांना फक्त ५ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकारी आयोध्या पौळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधत मिशा कधी काढणार असा सवाल केला होता.