
जळगाव मिरर | ३ मार्च २०२६
जाणता राजा नगर परिसरातील प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल अडकमोल यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाला भिक्षूसंघ, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पूज्य भदंत धम्मबोधिजी थेरो यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भगवान बुद्धांच्या शिकवणीचा संदर्भ देत समाजात समता, बंधुता आणि करुणा यांचा प्रसार होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. नव्याने उभारण्यात आलेले प्रवेशद्वार हे केवळ वास्तूशोभा नसून सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आयु. रविंद्र तायडे, बोदवडचे तहसीलदार आयु. ज्ञानेश्वर सपकाळे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बुद्ध विहाराचे सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे परिसरातील युवकांना सकारात्मक दिशा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष आयु. मनोज अडकमोल, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आयु. बापू साळुखे, आझाद समाज पार्टी (कांशीराम) चे युवा शहराध्यक्ष आयु. सुशील अडकमोल (उर्फ मोनू), आयु. विनोद सपकाळे, आयु. देविदास भास्कर, आयु. जिभाऊ हटकर, आयु. प्रताप वानखेडे, आयु. नंदकुमार गायकवाड यांच्यासह भिमानं बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भागवत सपकाळे यांनी मानले. संपूर्ण सोहळा शांततामय, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नव्याने उभारण्यात आलेले हे प्रवेशद्वार जाणता राजा नगर परिसरासाठी अभिमानाची बाब ठरत असून, सामाजिक एकोप्याचे प्रतीक म्हणून ते ओळखले जाणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.





















