
जळगाव मिरर | ८ मे २०२६
पश्चिम बंगाल आणि आसाममधील भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या जळगाव शहरातील भाजप कार्यकर्त्याच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या रोहिदास अडकमोल या संशयितावर जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल व आसाममध्ये भाजपने मिळवलेल्या विजयानंतर, जळगाव शहरातील भाजप कार्यालयात जल्लोष करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला होता. या जल्लोषाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. यापैकी एका व्हायरल व्हिडिओवर रोहिदास अडकमोल या व्यक्तीने महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह कमेंट दिली होती. ही कमेंट पसरल्यानंतर भाजप कार्यकर्त्यामध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली होती. संबधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. तर भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीची दखल घेण्यात आली आहे.





















