नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा ही वेगवान पद्धतीनं सुरु होणार आहे. देशात 5G सेवा सुरु होत असून पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5 जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात आली. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी 5G इंटरनेटची सुरुवात करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
भारतात 5G ची सुरुवात ही भारताच्या दूरसंचार इतिहासातील सामान्य घटना नाहीय. ही सेवा म्हणजे, 130 कोटी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा आहेत. 5G सह भारत सब का डिजिटल साथ आणि सब का डिजिटल विकासाच्या दिशेनं एक मजबूत पाऊल उचलेल. भारतानं थोडी उशीरा सुरुवात केली असेल. परंतु, आम्ही जगापेक्षा उच्च दर्जाची आणि अधिक परवडणारी 5G सेवा आणणार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं. ते 5G सेवेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
मोदी म्हणाले, आजच्या तारखेची इतिहासात नोंद होणार असून भारतानं आज नवा इतिहास रचला आहे. 5G मुळं गावागावांत क्रांती होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळं शिक्षणात क्रांती झाली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत आपल्या देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक तहसीलमध्ये 5G पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. Jio ची 5G सेवा भारतात विकसित झाली आहे, त्यामुळं त्यावर आता आत्मनिर्भर भारतचा शिक्का नोंदवला गेला आहे. भारतीय दूरसंचार उद्योग म्हणून, आम्ही जे काही दाखवलं आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. आता आम्ही नेतृत्व करण्यास तयार आहोत, असंही मोदींनी स्पष्ट केलं. आज देशाच्या वतीनं, दूरसंचार उद्योगाच्या वतीनं 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपानं एक अद्भुत भेट मिळाली आहे. 5G ही संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयांचं खूप खूप अभिनंदन करतो, असंही मोदी म्हणाले.
आज आपण छोटे व्यापारी, छोटे उद्योजक आणि कारागीर बनलं पाहिजे, डिजिटल इंडियानं सर्वांना एक व्यासपीठ दिलं आहे, बाजारपेठ दिली आहे. आज तुम्ही स्थानिक बाजारात किंवा भाजी मंडईत जा आणि पहा की एखादा छोटासा रस्त्यावरचा विक्रेताही तुम्हाला सांगेल. रोख नाही, ‘UPI’ करा. आज देश दूरसंचार क्षेत्रात जी क्रांती पाहत आहे, तो याचा पुरावा आहे. सरकारनं योग्य हेतूनं काम केलं, तर नागरिकांचे इरादे बदलण्यासाठी कोणतीही कसर लागत नाही, असं मोदी म्हणाले.
एक काळ असा होता, जेव्हा मूठभर उच्चभ्रू वर्ग गरीब लोकांच्या क्षमतेवर शंका घेत होता. गरिबांना डिजिटलचा अर्थही कळणार नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. पण, देशाच्या सामान्य माणसावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. सरकारनं स्वतः पुढं जाऊन डिजिटल पेमेंटचा मार्ग सोपा केला आहे. सरकारनं स्वत: अॅपद्वारे नागरिक केंद्रित वितरण सेवेला प्रोत्साहन दिलं. मग ते शेतकरी असो किंवा छोटे दुकानदार, आम्ही त्यांना अॅपद्वारे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा मार्ग दिला आहे. आपल्या देशाच्या ताकदीकडं आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु झालीय. या पार्श्वभूमीवर अनेक मोबाईल कंपन्यांनी आधीपासून 5 जी मोबाईलवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली होती. सध्या बाजारात अनेक 5G मोबाईल उपलब्ध आहेत. तर काही कंपन्या सर्वात स्वस्त 5G मोबाईल देत आहेत. रिलायन्स जियो कंपनीनं नुकताच जिओ 5G फोन लाँच केला आहे. 5G बाबत सर्वसामान्यांना अनेक प्रश्न आहेत. 5G इंटरनेट कसं असेल? 5G नेटवर्क, सिम कार्ड, स्पीड आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती इथं जाणून घ्या.
5G इंटरनेट सेवा म्हणजे Fifth Generation अर्थात पाचवी पिढी असा आहे. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशनची पाचवी पिढी म्हणून ओळखली जाते. 5G नेटवर्क 2G , 3G , 4G नेटवर्कपेक्षा अधिक वेगवान असेल. 5G नेटवर्क 4G पेक्षा कमीतकमी 10 पटीने वेगानं इंटरनेट स्पीड देईल.
सध्या बाजारात 2G ते 4G पर्यंत सिम कार्ड उपलब्ध आहे. काही कंपन्यांच्या मते, 4G सिम कार्डमधेच 5G इंटरनेट सेवा वापरता येईल. तुम्ही तुमचं 4G सिम कार्ड 5G मध्ये अपग्रेड करु शकता. यामुळे 4G वरून 5G सेवा अपग्रेड केल्यानंतर सिम कार्ड ग्राहकांना बदलावं लागणार नाही. ग्राहकांना त्यांच्या टेलिकॉम ऑपरेटरना कळवून त्यांचे 4G कनेक्शन थेट 5G मध्ये रूपांतरित करता येईल.
महाराष्ट्रात दोन प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली जाणार
महाराष्ट्रात दोन प्रमुख शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 5G सेवा सुरु केली जाईल. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. यासोबत दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, गांधीनगर, हैदराबाद, जामनगर, लखनौ या शहरांमध्येही 5G सेवा सुरु केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.