
जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२५
भारताने आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला. तेव्हापासून पाकिस्तानचे धाबे दणाणले असून त्यांना आता भविष्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईची भीती वाटत आहे. दरम्यान, शनिवारी (26 एप्रिल) झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पूर आला आहे.
शनिवारी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (पीओके) मुजफ्फराबाद आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना मोठा झटका बसला, कारण झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक मोठी वाढ झाली. यावरून पाकिस्तानने भारतावर आरोप केला. भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता उरी धरणातून पाणी सोडले, ज्यामुळे 1960 च्या सिंधू जल कराराचे उल्लंघन झाले आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भारताने नद्यांचे पाणी थांबवण्याची घोषणा केली होती. आता पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये दावा केला जात आहे की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता अचानक झेलम नदीत पाणी सोडले. ज्यामुळे PoK मधील मुझफ्फराबादमध्ये पूरजन्य परिथिती निर्माण झाली आहे. तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.




















