जळगाव मिरर | २७ जून २०२४
राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच खान्देशातील नंदूरबार जिल्ह्यात देखील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोन्याच्या बाळीसाठी झोपलेल्या वृद्धाच्या डोक्यावर वार करून ठार करण्यात आले. नंतर वृध्दाचा कान कापून कानातील सात ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी काढून नेल्याची संतापजनक घटना नंदुरबार तालुक्यातील बलवंड शिवारात बुधवारी दुपारी उघडकीस आली. याबाबत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भटा मखन बोरसे (७८, रा. ऐचाळे ता.साक्री) असे मयताचे नाव असून बोरसे यांचे बलवंड शिवारात शेत आहे त्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या बाहेर ते रात्री झोपले होते. मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळच्या दरम्यान अज्ञाताने त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना ठार केले. त्यानंतर त्यांच्या कानातील सोन्याची बाळी काढण्यासाठी त्यांचा कानच ब्लेडने कापून काढला. याबाबत मयताचा मुलगा अशोक भटा बोरसे यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.