जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२४
देशातील अनेक राज्यात आज देखील प्रेमविवाहाला मोठा विरोध आहे. नुकतेच पंजाब राज्यातील तरणतारण जिल्ह्यातील बल्टोहा येथे प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाच्या ५५ वर्षीय आईची मुलीच्या घरच्या लोकांनी नग्न धिंड काढल्याची घटना घडली. या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बल्टोहातील जीवननगर मोहल्ल्यातील आकाशदीपसिंग याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या रमणजीत कौर हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. त्यामुळे चिडलेल्या रमणदीपच्या घरच्या लोकांनी आकाशदीपची आई कुलविंदर कौर यांची नग्न धिंड काढली. कुलविंदर कौर यांनी आरोपी शरणजीतसिंग, गुरचरणसिंग, मनी आणि २ अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. तक्रारीनुसार, आरोपींनी कुलविंदर कौरच्या घरी येऊन धिंगाणा घातला. त्यानंतर तिला नग्न करून गावभर फिरवले. त्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.




















