जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२३
राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारमध्ये गेल्या काही महिन्याआधीच अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना आता खुद्द अजित पवार नाराज असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस हे दिल्लीत तातडीने अमित शाह यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवगिरी बंगल्यावर तातडीने बैठक अजित पवार यांनी बोलावली आहे. मुंबईतील भाजपच्या कार्यक्रमात महायुतीत भाजप मोठा भाऊ असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवार हे आज (मंगळवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील गेले नाहीत. अजित पवार हे आजारी असल्याचे कारण देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादा नाराज असल्याचे सांगितले. मात्र अजितदादा नाराज आहेत की आजारी आहेत?, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. अजित पवार ७ तारखेला जीएसटी कौन्सिल बैठकीला देखील दिल्लीला जाणार नाहीत, अशी माहिती समोर येते आहे. अजित पवार यांची नाशिकमध्ये नियोजित सभा असल्याचे बोलले जात आहे. मात्र राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. साम टिव्हीने याबाबत माहिती दिली आहे.