जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यात गेल्या काहीं महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरु आहे. यावर महसूल प्रशासन नेहमीच थातूरमातुर कारवाई करीत असताना आता जळगाव एलसीबी ॲक्शन मोडवर येत आता कारवाई सुरु केली आहे. गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे किनी मशिन, तीन ट्रॅक्टरसह सुमारे १५ ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई शुक्रवार दि. ७ रोजी खेडी खुर्द गावात केली.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात होता. याबाबत वाळू उपसा करणाऱ्यांसह वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ विजय पाटील, नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, रविंद्र कापडणे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांचे पथक रवाना झाले. या पथकाने वाळू उपसा करणाऱ्यांवर नदीपात्रात छापा टाकला. पोलिसांनी वाळू उपसा केलेली १५ ब्रास वाळूसह तीन ट्रॅक्टर व किनी असे साहित्य जप्त केले. यापक्ररणी पोलीसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पथकाला नदीपात्रातून रविंद्र गोकुळ सपकाळे (रा. खेडी, खुर्द, ता. जळगाव) या वाळू माफियांने ट्रॅक्टरला लावलेल्या किनीच्या सहाय्याने वाळूचा उपसा केल्याचे दिसून आले. तसेच त्याच्या घरासमोरन वाळू वाहतुक करणाऱ्यासाठी तीन ट्रॅक्टर देखील लावलेले होते.



















