
जळगाव मीरर | ३१ डिसेंबर २०२५
शहरातील गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी (दि. ३१) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून सतर्क नागरिकांनी आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, साई गणेश गोराडे (वय १८, रा. डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साई हा गोलाणी मार्केट परिसरात असताना संशयित आरोपी शुभम सोनवणे याने जुन्या किंवा अज्ञात कारणावरून त्याच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि शुभमने आपल्याकडील चाकूने साईच्या छातीवर सपासप वार केले.
भरदिवसा व भरबाजारात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी धैर्य दाखवत पळून जाणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडले व तातडीने शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साई गोराडे याला नागरिकांनी तत्काळ रिक्षातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण तपासले जात आहे.




















