
जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२५
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील एकूण 207 कर्मचारी यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी मार्च 2025 मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने राबविण्यात आली असून संपूर्ण कार्यवाही पारदर्शक व न्याय्य ठेवण्यात आली आहे. यासाठी सर्व संबंधित बैठकींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आले आहे. पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये विविध विभागांतील कर्मचारी समाविष्ट आहेत. त्यात बांधकाम विभागातील 11, ग्रामपंचायत विभागातील 11, कृषी विभागातील 5, आरोग्य विभागातील 63, पशुसंवर्धन विभागातील 7, अर्थ विभागातील 14, सामान्य प्रशासन विभागातील 3 आणि शिक्षण विभागातील 93 कर्मचार्यांचा समावेश आहे.
या पदोन्नतीत सहाय्यक लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, आरोग्य सेवक/सेविका/सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, ग्रेडेड मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी आदी पदांचा समावेश आहे.





















