जळगाव मिरर / ६ एप्रिल २०२३ ।
जळगाव शहरातील विविध विकासकामासाठी शहराचे आमदार सुरेश(राजूमामा) भोळे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा करीत १०० शहरातील रस्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बहूप्रतीक्षित असलेला १०० कोटी रुपयांचा निधी अखेर मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात राज्य शासनाकडून ५० कोटी रुपये निधी प्राप्त होणार आहे. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी यासाठी राज्य शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला होता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जळगाव शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती.
मात्र त्यानंतर काही वर्ष लोटली तरी जळगाव शहराला निधी मिळाला नव्हता. हा निधी मिळवण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर बुधवारी ५ एप्रिल रोजी राज्य शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील ५०% निधी पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात येणार आहे. या निधीअंतर्गत जळगाव शहरातील रस्त्यांचे कॉक्रिटीकरण केले जाणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे निधी मिळवून देण्यासाठी मोठे सहकार्य लाभले, अशी माहिती आ.राजूमामा भोळे यांनी दिली.
राज्य शासनाने काढलेल्या जीआर मध्ये म्हटले आहे की, सदर प्रकल्प खर्चाचा १००% हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे. प्रकल्प अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या कामांचा कामांना प्रकल्प खर्चाच्या मर्यादित सक्षम प्राधिकाऱ्यांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली याची खातरजमा जिल्हाधिकाऱ्यांनी करायचे आहे. प्रकल्पाअंतर्गत कार्यान्वयन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभागाची राहणार आहे. निविदा प्रक्रियेद्वारे कामकाज चालेल.