
जळगाव मिरर | ६ जून २०२५
गेल्या काही दिवसापासून पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात आता तपास सुरु झाल असून तपास वेगवेगळ्या वळणावर येत असताना, आता या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या सनसनाटी आरोपांनी सुपेकर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या, “एका आर्थिक गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला पुण्याहून अमरावतीच्या तुरुंगात हलवण्यात आलं. त्याठिकाणी सुपेकरांनी त्याची भेट घेऊन 500 कोटींची मागणी केली, असं त्या आरोपीने सांगितलं.” त्यांचं म्हणणं आहे की, सुपेकर यांनी स्पष्टपणे त्या कैद्याला सांगितलं, “तुझ्याकडे 1500 कोटींची मालमत्ता आहे, त्यातील 500 कोटी द्यायचे, अन्यथा तुरुंगातच सडत राहशील.”
त्याचबरोबर दमानियांनी आणखी एक धक्कादायक दावा केला की, साडे तीन तास सुपेकर त्या जेलमध्ये बसून होते, आता अशी देखील माहिती मिळते की अमरावतीचे तिथले जे जेलर होते ते सुद्धा या सुपेकरांचे नातलग होते असं त्यांनी मला सांगितलंय, आता मी ती पण चौकशी करणार आहे की ते नातलग म्हणजे नेमके कोण होते. आता या सगळ्या गोष्टींनी रोज नवनवीन खुलासे होतात. तसेच काल मला अजून एका केस ची माहिती मिळाली आहे. प्रत्येक PI कडून ते पैसे घ्यायचे ते दिवाळीला एक तोळं सोनं घ्यायचे आणि जळगावची मिठाई लय भारी असल्याने खरेदी करायचे. असं अंजली दमानिया म्हणाल्या.
त्यामुळे “या सगळ्या प्रकारांची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः यासंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. हे प्रकरण केवळ पोलिसी गैरवर्तणूक नाही, तर संपूर्ण यंत्रणेशी संबंधित आहे.” असं दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, सुपेकर यांच्याभोवतीचा आरोपांचा फास आता आणखीनच घट्ट होत असल्याचे चित्र दिसत आहे.




















