जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२४
शहरातील अजिंठा चौफुली जवळून बसमधून प्रवास करत असतांना दोन महिलांच्या पर्समधून ६ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, किरण योगेश बोरसे (वय ३४, रा.भुसावळ) ही महिला नणंद मनिषा सहावे यांच्यासोबत रविवारी अयोध्यानगरातील एका नातेवाईकाकडे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर त्या भुसावळकडे जाणाऱ्या ठाणे-मुक्ताईनगर (एमएच २० बीएल ३५५३) या बसमध्ये शहरातील अजिंठा चौकातून बसल्या. मात्र, बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेत, चोरट्यांनी किरण बोरसे यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले.
काही वेळानंतर बोरसे यांनी पर्स पाहिली असता, दागिने पर्समध्ये नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या नणंद मनिषा सहावे यांच्या पर्समधूनदेखील दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, या बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिलांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्यांनी ४ लाख २० रुपये किंमतीचे ३-३ तोळ्याची सोन्याची दोन पट्टा पोत, २ लाख १० हजार रुपये किंमतीचा ३ तोळ्याचा सोन्याचा हार असा एकूण ६ लाख ३० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पोलिसात नोंद केली आहे.