
जळगाव मिरर | ३ मार्च २०२६
भाचीच्या लग्नासाठी आत्याने घरात ठेवलेले २ लाख ८ हजार रुपयांचे दागिने भाच्यानेच चोरुन नेले. ही घटना दि. २६ फेब्रुवारी रोजी राजीव गांधी नगरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी दि. १ मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित भाचा समाधान लोंढे, त्याचे मित्र प्रेम संजू सकट, निखील लक्ष्मण हागडगे या तीन जणांना अटक करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की शहरातील राजीव गांधी नगरमधील रहिवासी सुनीता वामन लोंढे (वय ३४) यांनी भाचीच्या लग्नासाठी १० व ३ ग्रॅम अशा दोन सोन्याच्या पोत. ८ ग्रॅमचे कर्णफुले, ४० हजार रुपये किमतीच्या कानातील साकळ्या असे एकूण २ लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने पेटीत ठेवले होते. दि. २६ फेब्रुवारी रोजी त्यांना दागिने ठेवलेली पेटी दिसून आली नाही. त्याविषयी त्यांनी भाचीला विचारला केली असता मध्यरात्री समाधान लोंढे हा घराच्या बाहेर जाताना दिसल्याचे सांगितले. दागिन्यांच्या पेटीविषयी आत्याने भाचा समाधान याच्याकडे विचारणा केली असता, त्याने मित्रांसह संगनमत करून पेटी व त्यातील दागिने नेल्याचे सांगितले. त्याच्याकडे मागणी करूनही त्याने दागिने दिले नाही. त्यामुळे महिलेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयित समाधान लोंढे, प्रेम सकट, निखील हातगडे, साहील अवचारे या चार जणांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला. यातील साहील अवचारे पसार असून अन्य तीन जणांना पोहेकॉ जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, नीलेश पाटील यांच्या पथकाने अटक केली.




















