जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२६
मनपा निवडणुकीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास अकोट फैल भागात घडली. शरद श्रीराम तुरकर (रा. प्रभाग क्रमांक २ ‘ब’) असे जखमी नगरसेवकाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून वाहनांची व दुकानांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ ‘ब’ मधून भाजपचे उमेदवार शरद तुरकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा सुमारे २ हजार २०० मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानिमित्त अकोट फैल भागातून विजय रॅली काढण्यात आली होती.
दरम्यान, रॅलीनंतर सत्कार स्वीकारण्यासाठी जात असताना नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर अचानक चाकूहल्ला करण्यात आला. भाजपचेच प्रभाग क्रमांक २ ‘ड’ मधील पराभूत उमेदवार नितीन राऊत व त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हल्ल्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आल्याने वाद चिघळला आणि परिसरात तणाव निर्माण झाला.
या गोंधळात काही वाहनांची व दुकानांची तोडफोड झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले शरद तुरकर यांना तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.




















