जळगाव मिरर | ११ नोव्हेंबर २०२५
चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे कासव पाहताना तोल गेल्याने विहिरीत पडलेल्या ७वर्षांच्या नातवाला वाचवण्यासाठी ६५ वर्षीय आजोबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत तब्बल ११० फूट खोल विहिरीत उडी घेतली. त्यांच्या धाडसामुळे नातू थोडक्यात बचावला. ही थरारक घटना पिलखोड येथे घडली आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम बाविस्कर यांचे देशमुखवाडी शिवारात शेत आहे. शनिवारी ते आपला नातू श्रावण बाविस्कर (वय ८) याच्यासह गायींना पाहण्यासाठी शेतात गेले होते. शेतातील गायींना पाणी पाजण्याच्या कामात आत्माराम बाविस्कर व्यस्त असताना श्रावण खेळत होता. दरम्यान, त्याचा तोल जाऊन तो शेजारीच असलेल्या विहिरीत पडला. अचानक पाण्यात पडल्याचा आवाज ऐकून आजोबांनी विहिरीकडे धाव घेतली. आत डोकावून पाहिले असता नातू पाण्यात हातपाय मारत असल्याचे दिसले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता आत्माराम बाविस्कर यांनी ११० फूट खोल विहिरीत उडी घेतली. विहिरीत जवळपास ७० फूट पाणी होते.
त्यावेळी त्यांनी नातवाला अलगद पकडून खांद्यावर घेतले आणि विहिरीत असलेल्या पंपाच्या दोराचा आधार घेत सुरक्षित ठेवले. दरम्यान, त्यांचे आवाज ऐकून जवळच असलेल्या तरुणाने विहिरीकडे धाव घेतली व शेतातील इतरांना बोलावून आणले. सर्वांनी मिळून आजोबा आणि नातवाला सुरक्षित बाहेर काढले. या प्रसंगानंतर दोघांनाही शेतकऱ्यांनी मिठीत घेताच आजोबा नातवाला घट्ट बिलगून रडू लागले, तर नातूही आपल्या आजोबांच्या गळ्यात पडला. या घटनेमुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. तर ग्रामस्थांनी आत्माराम बाविस्कर यांच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. आजोबा आणि नातवामधील जिव्हाळ्याचे नाते किती जिव्हाळ्याचे असते, याचा प्रत्यय या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे.



















