जळगाव मिरर | २४ मार्च २०२४
लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यापासून राज्यातील वर्धा लोकसभा मतदार संघातील उमेदवारी मिळावे यासाठी कराळे मास्तर शरद पवारांची नेहमीच भेट घेत आहे आज देखील त्यांनी तब्बल सातव्यांदा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. वर्धा लोकसभा जागेसाठी कराळे गुरुजी इच्छुक असून त्या पार्श्वभूमीवर ते शरद पवार यांच्या भेटीला सातत्याने येत आहेत. त्यांची पवारांसोबतची ही सातवी भेट आहे. शरद पवार यांनी जर आदेश दिला तर ही निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया कराळे गुरुजी यांनी मागच्या आठवड्यात दिली होती. त्यातच आता राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मागणार असे ते म्हणाले.
दरम्यान, ”शरद पवारांसोबत आज सातवी भेट झाली. शरद पवारांनी काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. लोकसभा निवडणूक आणि उमेदवारीबाबत 26 किंवा 27 तारखेला अंतिम निर्णय होईल. अमर काळे तयारी लागले आहेत त्यांच्या उमेदवारी बाबत अंतिम निर्णय नाही. आधी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार आहे आणि नंतर उमेदवारी मागणार आहे”, असं नितेश कराळे यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी विद्यमान खासदारांवर आरोप केले आहेत. ”मी एकनिष्ठ राहणार असा शब्द दिला आहे. महाविकास आघाडीचे काम करत असून कोणत्याही आमदार खासदारांविरोधात बोलत नाही. वर्धा लोकसभेत 3 ते 3.5 लाख मते मला मिळू शकतात. विद्यमान खासदारांनी 10 वर्षात विकासकामं केली नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत”, असा आरोप नितेश कराळे म्हणाले.
यावेळी त्यांनी निवडणूक लढवणार आणि जिंकून येणारच असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. ”तुतारी घेऊन संसदेत पक्षाचा आवाज बुलंद करेन असं शरद पवारांना सांगितले. लोकांच्या हितासाठी मी लढतो आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न मला माहिती आहेत. या प्रश्नांना लोकसभेत मांडणं आणि ते प्रश्न सोडवणं गरजेचे आहे. त्यासाठी मी उमेदवारी मागतो आहे. शरद पवारांनी ही उमेदवारी दिली तर मी निश्चित लढणार आणि निवडूनही येणार आहे”, असं कराळे गुरुजी म्हणाले.