जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२५
खान्देश कॉलेज एज्युकेशन (KCE) सोसायटी, जळगाव या नामवंत शैक्षणिक संस्थेचा ८१ वर्षांचा प्रवास साजरा करण्यासाठी १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता केसीई संस्थेच्या प्रांगणात एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या दिवशी केसीईच्या सर्व संस्था एकत्र येऊन, विविध माध्यमांतून त्यांच्या वाटचालीचा आढावा सादर करणार आहेत. एकूण १७ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ही संस्था शिक्षण क्षेत्रात आजवर केलेल्या कार्याची उजळणी होणार आहे.
कार्यक्रमास क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, मा. उपकुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अँड. प्रकाश पाटील असतील.
या कार्यक्रमात संस्थेच्या ८१ वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकणारी विशेष चित्रफीत सादर केली जाणार असून, संस्थेच्या कार्याचा आणि गौरवशाली इतिहासाचा थोडक्यात आढावा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
१९४४ मध्ये ‘ज्ञान प्रसारो व्रतम्’ या ब्रीदवाक्यासह स्थापन झालेल्या केसीई सोसायटीने सुरुवातीस विद्या प्रसारक संस्थेच्या इमारतीत कार्य सुरू केले. १९४९ मध्ये दानशूर मूळजी जेठा यांनी दिलेल्या जागेत संस्था स्थायिक झाली. गेल्या पाच वर्षांमध्ये आयएमआर, इंजिनीअरिंग कॉलेज, लाँ कॉलेज, मुलांचे वसतिगृह, व ५०० प्रेक्षक क्षमता असलेले अत्याधुनिक नाट्यगृह अशी उल्लेखनीय प्रगती संस्थेने केली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) अन्वये, संस्था आता अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार व योगशास्त्र अशा विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रम देत आहे.
या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे उपाध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, डी.टी. पाटील, प्रा. मृणालिनी फडणवीस, शशिकांत वडोदकर, व प्राचार्य संजय भारंबे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण खान्देशमध्ये केसीईच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला जात आहे.