जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२६
भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहिणाबाई महोत्सवास शुक्रवारी उत्साहात सुरुवात झाली. बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून चैत्राम पवार यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
या पाचदिवसीय महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, सत्यनारायण बाबा मौर्य यांची भारत माता की आरती, ह. भ. प. रविकिरण महाराज यांचे किर्तन, देशभक्तीपर गीते, वहीगायन, भावगीते, मराठी संस्कृतीचा फॅशन शो आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपल्या कलेचे सादरीकरण करणार असून, खाद्यपदार्थ व गृहपयोगी वस्तूंचे विविध स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
महोत्सवाच्या प्रारंभी खेळ पैठणीचा, रांगोळी, चित्रकला व मेहंदी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी चैत्राम पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. खासदार स्मिता वाघ यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या ११व्या पर्वाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनिष जैन, अनिकेत पाटील, अनिश शहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, दिपक सराफ, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, श्रीराम पाटील, डॉ. पी. आर. चौधरी, शैलेश मोरखडे, नगरसेवक दिपक सुर्यवंशी, जयश्री राहुल पाटील, माधुरी बारी, दिपक जोशी, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, पवन जैन, सागर परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन विनोद ढगे व डॉ. राजेंद्र देशमुख यांनी केले, तर प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी मांडले.
विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुखराज पगारीया व निळकंठ गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने, तर प्राचार्य मानसी गगडाणी यांना शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उद्यापासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. आज सायंकाळी साज मेकअप आर्टिस्ट स्टुडिओ संचलित “मराठी संस्कृतीचा फॅशन शो” आयोजित करण्यात आला आहे.




















