जळगाव मिरर | १ एप्रिल २०२५
भुसावळ शहरातील खडका रोडवरील जाम मोहल्ला परिसरातील कब्रस्तानजवळ अज्ञात व्यक्तीने युवकावर चाकु हल्ला केल्याची घटना ३१ मार्चला सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठन केल्यानंतर भर दिवसा गजबजलेल्या भागातील जाम मोहल्ला परिसरातील कब्रस्तानजवळ पूर्व वैमनस्यातून रिजवान शेख याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने धारधार चाकूने हल्ला केला. यात रिजवान शेख गंभीर जखमी झाला आहे. हल्ला करून हल्लेखोर घटना स्थळावरून पसार झाला. याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. दरम्यान, गत महिन्यात खडका रोडवरील अमरदीप चौकातील पटेल टी सेंटर येथे जुन्या वादातून एका युवकाची गोळ्या झाडून निघृणपणे हत्या करण्यात आली होती.