
जळगाव मिरर । १४ ऑक्टोबर २०२२
देशात नियमित होत असलेल्या इंधनाच्या दरांमुळे सर्वसामान्य जनता आधीच महागाईने बेजार झाली आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. एसटी महामंडळाने ऐन दिवाळीत भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीत एसटीने प्रवास करण्यासाठी आता खिसा आणखी हलका करावा लागणार आहे.
ऐन दिवाळीत भाऊबीज, लक्ष्मीपूजनानिमित्ताने अनेक जण गावी प्रवास करतात. यावेळेतच एसटीने 10 टक्क्यांनी तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तिकीट दरवाढ 21 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने अतिरिक्त पैसे मोजून एसटीनेच प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान ही एसटीची भाडेवाढ हंगामी स्वरुपाची आहे. एकूण 10 दिवसच ही भाडेवाढ असणार आहे. 21 ते 31 ऑक्टोबरदरम्यानच अतिरिक्त भाडेवाढ आकारण्यात येणार आहे.





















