जळगाव मिरर | २७ जून २०२४
जळगाव शहरातील वेगवेगळ्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. सात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये सात जणांविरुद्ध जिल्हापेठ, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे गांजा ओढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मेहरुण तलाव परिसरातील मनपाच्या जलतरण तलावच्या भिंतीच्या आडोशाला, मेहरुणच्या बगीच्याजवळील विहरीजवळ, मेहरुणच्या बगीचामध्ये, अजय कॉलनीतील उपकेंद्रामागे, बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बगीचाच्या भिंतीच्या आडोशाला व नवीन बसस्थानकाच्या मागील बाजूस गांजा ओढणाऱ्यांवर ही कारवाई केली. त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. नितीन बाविस्कर, हरीश परदेशी, राजेश मेढे, रवी नरवाडे यांनी केली. याप्रकरणी शेख मशरुफ अब्दुल कादीर (४२, रा. गवळीवाडा), वसीम शेख तलत मेहमूद (३९, रा. काट्याफाइल), फय्याज शेख समशू (३६, रा. तांबापुरा) या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर किरण भगवान सकट (३१, रा. हरिविठ्ठलनगर), योगेश रमेश बाविस्कर (३४, रा. हरिविठ्ठलनगर), गणेश शालिग्राम धांडे (४१, रा. मुक्ताईनगर), अनिल रघुनाथ राणे (६२, रा. भिकमचंदनगर) या चौघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.