जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२४
खान्देशात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याचा हल्ला होण्याच्या घटना नेहमीच घडत आहे नुकतेच खान्देशातील नंदुरबार शहरात बिबट्या फिरत असल्याच्या वार्ता अनेक दिवसापासून सुरु असतानाच शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावरील लोय गावातील आश्रम शाळेतील इ.2 री चा निवासी विद्यार्थी मनोहर कालुसिंग वसावे (मु.कोढली पो. मोरंबा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार) या चिमुकल्यावर हल्ला करून बिबट्याने ठार मारल्याची घटना घडली असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. दरम्यान प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाच्या पालकांना शासनाच्या वतीने सुमारे दहा लाखाची तातडीची रोख मदत जाहीर करण्यात आलेली आहे. शासकीय नियमानुसार 25 लाख रुपये रोख भरपाई देण्यात येते त्यापैकी ही तातडीची दहा लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या विषयी अधिक वृत्त असे की, नंदुरबार तालुक्यातील लोय गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळा असून आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थी कु. मनोहर कालुसिंग वसावे (मु.कोढली पो. मोरंबा ता. अक्कलकुवा) हा गुरुवार (दि.29) रोजी सकाळी मृत अवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह छिनविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने त्याच्यावर बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून चिमुकल्याला ठार केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही घटना कळताच वन खात्याचे अधिकारी तातडीने धाव घेत त्यांनी पाहणी केली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी चंद्रकांत पवार यांनी मयत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून माहिती घेतली.
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोय ता.जि. नंदुरबार येथेगुरुवार (दि.29) रोजी पहाटे सुमारे (अंदाजे) 6 वाजेच्या दरम्यान इ.2 री चा निवासी विदयार्थी कु. मनोहर कालुसिंग वसावे (मु.कोढली पो. मोरंबा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार) या विदयार्थ्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला. मनोहर जखमी असल्याबाबत चौकीदार यांनी मुख्याध्यापक माळी यांना कळविले. माळी यांनी पाहणी केली असता विदयार्थ्याच्या गळयावर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरु होता. त्यामुळे तातडीने विद्यार्थ्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले. बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हल्ला करणारा प्राणी बिबट्याच आहे का याची खात्री करणे सुरु आहे. दरम्यान मयत विद्यार्थ्यांचे नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर आणखी माहिती उघड होईल असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.