
जळगाव मिरर / १ मे २०२३ ।
सोशल मिडीयावर अनेक लोक व्हिडीओ लाईक करून बक्कळ पैसे कमवा असे आवाहन करीत असतात अशाच एका आवाहनाला एक संगणक अभियंता बळी पडला व तब्बल १८ लाख रुपयांचा चुना त्याला लागला आहे. युट्युब वरील व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, हा मोह एका संगणक अभियंत्याला चांगलाच महागात पडला. गुंतवणुक केल्यास व्हीआयपी सदस्य होणार आणि त्यानंतर पैसे मिळायला सुरु होतील, असा बहाणा करून अभियंत्याला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अभियंत्याने तब्बल 18 लाख 80 हजार रुपये गुंतवले. मात्र अशा प्रकारे कधीच पैसे मिळत नसतात. हा केवळ फसवणुकीचा सापळा असल्याचे लक्षात येताच अभियंत्याने पोलिसात धाव घेतली. अमर अनिल लोमटे (वय 23, रा. थेरगाव) असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती आणि बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादींना व्हाट्सअपवर मेसेज केला. तुम्हाला जॉब ऑफर देण्यात येईल. तुम्हाला युट्युबवर व्हिडीओ लाईक करून प्रत्येक व्हिडिओला 50 रुपये मिळतील. व्हीआयपी सदस्य झाल्यास प्रत्येक व्हिडीओला 100 रुपये देण्यात येतील. व्हीआयपी सदस्य होण्यासाठी प्रीपेड टास्क पूर्ण करावे लागतील, असे सांगून फिर्यादीस गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादींनी तीन टप्प्यात तब्बल 18 लाख 80 हजार 400 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरले. त्यांनतर त्यांना कोणताही नफा अथवा जॉब न देता आरोपींनी संपर्क बंद केला. आपल्यासोबत झालेला प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली. वाकड पोलीस तपास करीत आहेत






















