जळगाव मिरर | ३० नोव्हेबर २०२४
सध्या आपल्या दैनंदिन बोलण्या चालण्यात कोणीही सहजरित्या आई बहिणीवरून एकमेकांना शिवीगाळ करीत असतो. काही अश्लील शिव्या लहान मुलांच्या कानावर पडून मुले सुद्धा अशा प्रकारच्या घाण शिव्या रिपीट करतात. त्यामुळे आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली पाहिजे, अशी संकल्पना समोर आणत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने गावात शिव्या देणाऱ्याला पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल, असा आदर्श निर्णय घेतला आहे. सौंदाळाच्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे असे सरपंच शरद आरगडे यांनी म्हटले आहे.
यावेळी बालकामगार बंदीचा देखील ठराव घेण्यात आला. बाल कामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा असे स्लोगन ठरवून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस दिले जाईल, असे ठरले. गावामध्ये बालविवाह शंभर टक्के बंदी करण्यात आलेले आहे. गावात कुणीही बालविवाह करू नये, केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही ग्रामसभेत ठरले. सोशल मीडियाच्या आणि मोबाईलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्याकडे मोबाईल द्यायचा नाही असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. या सर्व ठरावांची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली व अनुमोदन गणेश आरगडे यांनी दिले.
टोकाच्या भांडणाचे मूळ कारण म्हणजे शिवीगाळ करणे असते. शिवीगाळ करताना अर्वाच भाषेत महिलांच्या खाजगी भागा विषयी आरडून ओरडून सार्वजनिक ठिकाणी उल्लेख केला जातो. वास्तविक पाहता स्त्रियांचा त्या भांडणामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो तरी देखील तेथे स्त्री देहाचा अपमान केला जातो. शिवीगाळ करणारा हे वास्तविक विसरतो की आपण ज्या स्त्रीच्या खाजगी भागाचा उल्लेख करत आहोत तो भाग आपल्या आईला बहिणीला मुलीला देखील आहे. नऊ महिने ज्या आईच्या उदरात राहून जन्म घेतलेला असतो अश्या पवित्र देहाचा अपमान करतो हे चुकीचे असल्याने शिवीगाळ देण्यास बंदी आणण्यासाठी ग्रामपंचायतीने या बाबत कडक भूमिका घेऊन शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपये दंड करावा व तो न भरल्यास ग्रा. पं. दप्तरी त्याची नोंद घेऊन वसूल करण्यात यावा असे सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.