जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२४
राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालात महायुतीला मोठी साथ दिल्यानंतर गेल्या १० दिवसापासून राज्यात सत्ता स्थापन झाली नसून आज १1 दिवसांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. महायुतीमधील प्रमुख नेते फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे शपथविधी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत अद्याप साशंकता आहे. या संबंधीत प्रश्न विचारण्यात आला असता शिंदे यांनी संध्याकाळी स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे अजित पवार यांनी शिंदेंचे संध्याकाळी कळेल मी मात्र, शपथ घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावरुन चांगलाच हास्यकल्लोळ उडाला. तर यावरुनच दादांना संध्याकाळी आणि सकाळी शपथ घेण्याचा अनुभव असल्याची कोपरखळी शिंदे यांनी लगावली.
एकनाथ शिंदे हे नव्या मंत्रिमंडळात असतील का? या बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. फडणवीसांनी स्वत: त्याची माहिती दिली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या बाबत स्पष्ट बालणे टाळले. या संबंधीतला निर्णय अद्याप झालेला नसून संध्याकाळी या विषयीची माहिती देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय देणार, यासाठी महायुतीने काम केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला, त्याच ठिकाणी आम्ही फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. आज खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन करण्याचा आनंद असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.